जालना : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विशेष प्रयत्नातून रमाई घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी २३७३ अतिरिक्त घरकुलास मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात घरकुल बांधकामासाठी घरकुल निर्माण समितीने सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी रमाई योजनेंतर्गत केवळ १९०० प्रस्तावाचा लक्ष्यांकास मंजुरी दिली होती. परंतु जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची घरकुल बांधकामाबाबत सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेता मंजुरी असलेला १९०० घरकुलांचा प्रस्ताव हा पुरेसा नसल्याने पालकमंत्री टोपे यांनी विशेष प्रयत्नातून आणखी २३७३ अतिरिक्त रमाई घरकुल बांधकाम प्रस्ताव लक्ष्यांक जालना जिल्ह्यासाठी मंजूर केल्याने घरकुल बांधकाम लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व मागणी केलेल्या लाभार्थींना रमाई घरकुल योजनेसह इतर योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुल मंजुरीबाबत आपण सदैव प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले. जालना जिल्ह्यासाठी एकूण ४२७३ रमाई घरकुल मंजूर झाले असून, घनसावंगी मतदारसंघातील गावांसाठी यापैकी २७१९ घरकुलांचा मंजुरी लक्ष्यांक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.