लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा २६८ प्रकटदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साही वातावरणात गुरूवारी पार पडला. या निमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काकड आरतीने याला प्रारंभ होऊन आनंदी महात्म्य ग्रंथातील प्रकट दिनाच्या अध्यायाचे सामूहिक वाचन करण्यासह महाप्रसाद आणि रात्री कीर्तन पार पडले.थोर संत आनंदी स्वामी महाराजांचा गुरूवारी प्रकट दिना निकित्त समाधीस पहाटे पवमानाचा अभिषेक करून प्रारंभ करण्यात आला. दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी महिला आणि पुरूष भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाथ वंशज पुष्कर गोसावी यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सामूहिक प्रार्थना होऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला.पणत्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. दरवर्षी मंदिरात हा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो. स्वामींची पालखी मिरणूक ही आषाढी एकादशीच्या दिवशी काढण्यात येते. त्यावेळी सात दिवसांचा सप्ताह असतो, त्यात भजन, कीर्तन तसेच प्रवचन पार पडतात. एकूणच गुरूवारी दुपारी मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी झाली होती.सायंकाळी आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी शाल, श्रीफळ देऊन गोरंट्याल यांचा सत्कार रमेश महाराज ढोले यांनी केला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.
संत आनंदीस्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:49 IST