बदनापूर येथे बेशिस्त वाहनांवर कारवाई
जालना : बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील जालना-औरंगाबाद महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभा करून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या जितेंद्र खिल्लारे (रा.दुधनवाडी), शेख शमीम शेख अजीज (रा.बदनापूर), अय्युब खा गौस खा पठाण (रा.औरंगाबाद) व शेख खा अन्वर खा पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन
जालना : उमरगाव येथील जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव सारिका लोकरे-अंभुरे यांच्या ११ वर्षांच्या मुलावर राहत्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी १८ जानेवारी रोजी हल्ला केला. त्यामुळे लहान मुलाच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
माती टाकण्याचे काम सुरू
जालना : शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या बायपास मार्गाचे सिमेंटीकरण करून दुभाजकांमध्ये फुलांची झाडे लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कन्हैय्यानगरकडे असलेल्या मार्गाकडे बहुतांश काम झाले आहे, परंतु अंबड, मंठा चौफुली मार्गाचे काम संथगतीने होत आहे.
गणवेश वाटप
जालना : जालना तालुक्यातील वरुड येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय समितीचे अध्यक्ष कचरू सातपुते यांच्याहस्ते गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कुडके, आरमाळ, पठाण, यशवंत मोरे, शेख इम्रान यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.
कोदा येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य कृष्णा काळे, साहेबराव फुसे, ईश्वर घनघाव, विलास बावस्कर, गजानन बावस्कर, एकनाथ काळे, विनोद बावस्कर, निवृत्ती बोराडे, अरुण फुसे आदींची उपस्थिती होती.
पं.स. कार्यालयात स्वच्छता अभियान
भोकरदन : माझे कार्यालय सुंदर कार्यालय अभियानांतर्गत भोकरदन पंचायत समिती कार्यालयात शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत, कार्यालयीन अधीक्षक बी.एस. कपे, संजय जगताप, गिरी, सोनवणे हे उपस्थित होते.