निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम मशीन सील करणे, मॉकपोल दाखविणे, कामकाजात घ्यावयाची दक्षता आदी बाबींवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विस्कळीत वीजपुरवठा ; शेतकऱ्यांची गैरसोय
जालना : महावितरणकडून शेतीसाठी दिवसाच्या सत्रात होणारा वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी होणारे अपघात पाहता अनेकांनी दिवसा पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. त्यामुळे दिवसाच्या सत्रात सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
भोकरदन : शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहरांतर्गत भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याने अबाल-वृध्दांसह नागरिक जखमी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा शहरातील उच्छाद पाहता पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.
धुळीमुळे व्यापारी, नागरिकांची गैरसोय
जालना : शहरातील अंबड चौफुली ते शनीमंदिराकडे येणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, याचा नाहक त्रास या भागातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.