यंदा सुरुवातीपासूनच आष्टी आणि परिसरात चांगला पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर चांगली आल्याने शेतकऱ्यांनी खते आणि फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला. परंतु, मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परतूर तालुक्यातील सावरगाव येथे दरवर्षी पाऊस झाला की, गावाजवळ असलेल्या नदीला पूर येतो. त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. अनेकवेळा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जातात, अशी खंत सरपंच नवनाथ आयंदे यांनी व्यक्त केली. शनिवारी झालेल्या पावसाने नदीला पूर आला. या पुरातून ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागली. ऐन सणासुदीच्या काळात पुलावरून पाणी वाहात असल्याने गावातून बाहेर पडता येत नाही. आहे त्या परिस्थितीत सण साजरे करावे लागत आहेत. अनेकांना जीव धोक्यात घालून पुलावरून जावे लागत आहे, असे माजी सरपंच विठ्ठल तौर यांनी सांगितले.
आष्टी परिसरात विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST