लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरुवारी जाहीर केला. आठही पंचायत समितीच्या नवीन कारभाऱ्यांची ३० डिसेंबर रोजी विशेष सभा घेऊन निवड केली जाणार आहे.जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षणाची सोडत काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यात आठ पैकी पाच पंचायत समित्यांचे सभापतीपद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. तर इतर दोन सर्वसाधारण व एक नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. त्यात जालना अनूसूचित जाती महिला, परतूर नागरिकांचा मागासवर्ग महिला, जाफराबाद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, बदनापूर, भोकरदन आणि मंठा येथील पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवले आहे. तर अंबड आणि घनसावंगी येथील पंचायत समित्यांचे सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर आता ३० डिसेंबर रोजी या नवीन सोडती प्रमाणे पंचायत समित्यांच्या सभापतीसाठीची निवड प्रक्रिया होणार आहे. ३० डिसेंबर रोजी त्या- त्या तालुक्यातील पंचायत समित्यांच्या सभागृहात दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, सभापती म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. सभापतीपदावर वर्णी लागावी म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे सांगण्यात आले.पीठासीन अधिकारी३० डिसेंबरला पं.स कार्यालयात आयोजित बैठकीसाठी पीठासीन अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तहसीलदार श्रीकांत भुजबळ (जालना), तहसीलदार छाया पवार (बदनापूर), प्र. तहसीलदार गौरव खैरनार (भोकरदन), तहसीलदार सतीश सोनी (जाफराबाद), तहसीलदार रूपा चित्रक (परतूर), तहसीलदार सुमन मोरे (मंठा), तहसीलदार राजीव शिंदे (अंबड), तहसीलदार चंद्रकांत शेळके (घनसावंगी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पं.स. सभापती निवडीचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:40 IST