जालना : मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गरीब कुटुंब हैराण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेला मोफत गॅस बंद करून गृहिणी चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.
गोरगरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळावे, तसेच महिलांची धुरापासून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांची धुरातून सुटका झाली होती, परंतु मागील काही दिवसांपासून गॅसचे दर वाढत आहे. आता गॅस जवळपास ८०० रुपयांपर्यंत पोहोचला
आहे. त्यामुळे बहुतांश महिला गॅसवर स्वयंपाक करण्याऐवजी चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता, दरवाढीमुळे बहुतांश महिला चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे दिसून आले आहे. दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.
महागाईमुळे आर्थिक गणित बिघडले
मागील काही दिवसांपासून गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गॅस ८०० रुपयांवर गेल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.
आमचे चार जणांचे कुटुंब आहे. मोलमजुरी करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आम्हाला उज्ज्वला योजनाचा गॅस मिळाला आहे. सुरुवातीला आम्ही त्याचा वापरही केला, परंतु गॅसचे दर वाढल्यामुळे गॅसला बाजूला ठेवले आहे आणि आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे एका महिलेने सांगितले.
गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरवाढीमुळे गृहिणीच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार सबसिडीच्या नावाखाली पूर्ण पैसे वसूल करत आहे. सरकारने सबसिडी पूर्ववत करावी आणि गॅसच्या किमती नियंत्रित ठेवून गृहिणींना दिलासा द्यावा. आता आम्हाला चुलीशिवाय पर्याय नाही.
- निलोफर नजीब शेख
गृहिणी
महागाईमुळे त्रस्त असून, खर्चाचे नियोजन कोलमडले आहे. कधी-कधी अधिक प्रमाणात गॅसचा वापर होत असल्याने, महाग झालेले गॅस सिलिंडर आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती माफक असाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. निर्मला गायकवाड
गृहिणी
मागील काही दिवसांपासून गॅसचे भाव दिवसागणिक वाढत आहे. वाढत्या दरवाढीमुळे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडले आहे. आता गॅस परवडत नसल्याने चूल पेटवावी लागत आहे. मोदींनी सुरू केलेली योजना आता फक्त नावालच उरली आहे. शासनाने गॅसचे दर कमी करून महिलांना धुराच्या त्रासातून मुक्त करावे.
- निर्मला पवळ, गृहिणी