जालना : शाळेत येणाऱ्या मुला-मुलींची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून शाळांमध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२५ शाळांमधील स्वच्छतागृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर शाळेत येणाऱ्या मुला-मुलींची गैरसोय होत आहे.
जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असून, मुलांची उपस्थिती वाढावी, यासाठी विविध सोयी-सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार स्वच्छतागृहेही उपलब्ध करून दिली आहेत. जिल्ह्यातील १५०६ शाळांपैकी १३२२ शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता आहे, तर १८४ शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव आहे. उपलब्ध स्वच्छतागृहांपैकी ११९७ स्वच्छतागृहे वापरात असून, १२५ स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. खराब स्वच्छतागृहांमुळे लॉकडाऊननंतर शाळेत येणाऱ्या मुला-मुलींची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
१८४ शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव
जिल्ह्यातील १५०६ शाळांपैकी १३२२ ठिकाणी मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत, तर १२७२ ठिकाणी मुलांसाठी स्वच्छतागृहे आहेत. त्यातील मुलांचे १११५ तर मुलींचे ११९७ स्वच्छतागृहे वापरात आहेत. १५०६ पैकी १८४ शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव आहे. यात जालना तालुक्यातील ३०, बदनापूर तालुक्यातील २१, अंबड-२३, घनसावंगी-३६, परतूर-२७, मंठा-१४, भोकरदन- १९ व जाफराबाद तालुक्यातील १४ शाळांमध्ये स्वच्छतागृहाचा अभाव आहे. त्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. ही बाब पाहता कोरोनानंतर शाळा पूर्ववत सुरू होण्याच्या पूर्वी संबंधित शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत, अशांची माहिती संकलित केली जाते. ज्या शाळांमधील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे तेथील प्रस्ताव आमच्याकडे दाखल होतात. दाखल प्रस्तावानुसार निधीची आवश्यकता असेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. वरिष्ठस्तरावरून स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मुलांची गैरसोय होऊ नये, याची सर्वतोपरी दक्षता घेतली जाते.
-कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी
तालुका वापरात असलेली स्वच्छतागृहे दुरुस्तीस आलेली स्वच्छतागृहे
जालना १९८ ०१०
बदनापूर १३७ ००९
अंबड १९० ०२५
घनसावंगी १३७ ०१९
परतूर १०४ ००६
मंठा १३५ ०२१
भोकरदन २८७ ०२९
जाफराबाद १३४ ००६
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा १,५०६
स्वच्छतागृहांची दुरवस्था १२५
वापरातील स्वच्छतागृहे १,३२२
६२ लाख रुपयांची दुरुस्तीसाठी गरज