हिसोडा : भोकरदन तालुक्यातील दहिगावजवळील पुलाला भेगा पडल्या आहेत. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्यावर हिसोडा, आडगाव भोंबे, दहिगाव, जळकी बाजार ही गावे आहेत. या गावांतील ग्रामस्थ याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परंतु, मागील काही वर्षांपासून दहिगावजवळील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला भेगा पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे वाहतूक बंद होते. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पूल दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दहिगावजवळील पुलाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. पुलाचा काही भाग कोसळल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पुलाचे काम करून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनंता पाटील, अण्णा पाटील, भाऊसाहेब कानडजे, समाधान सुरडकर, राजेंद्र पाटील आदींनी केली आहे.
पावसाळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर आला की, पुलावरून ये-जा करता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने काम हाती घ्यावे. तसेच पुलाची उंची वाढवावी.
अनंता पाटील, ग्रामस्थ.