८५ ग्रा.पं.पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध
जालना : तालुक्यात होऊ घातलेल्या ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६१ बुथवर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
जालना तालुक्यात श्रीकृष्णनगर ग्रामपंचायत निवडणूक रद्द झाल्याने प्रत्यक्षात २७० प्रभागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा सार्वत्रिक कार्यक्रम राबविला जात आहे. सोमवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीचे चित्र समोर आले.
प्रत्यक्षात ८६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला होता; परंतु मध्यंतरी श्रीकृष्णनगर ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व टप्पे रद्द झाल्याने ८५ ग्रामपंचायतींसाठी पुढील टप्प्याची कार्यवाही सुरू आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर आता प्रत्यक्षात ६६४ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यासाठी निवडणूक होणारे प्रभाग २५४ असून, सात सहायक बुथ आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २६१ बुथवर मतदान होणार आहे.
परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पाच जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. शिवाय नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच नामनिर्देशनपत्र वैध राहिल्याने ६२ जागा बिनविरोध झाल्या, अशी माहिती कोरडे यांनी दिली.
या ग्रामपंचायती बिनविरोध
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधला जात असून, तालुक्यातील चार गावांनी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध केली आहे. यात घोडेगाव, तांदुळवाडी खुर्द, तांदुळवाडी बुद्रुक व नसडगाव या गावांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.