लोकमतचा दणका ; वृत्त प्रकाशित होताच पोलीस प्रशासनाला आली जाग
राजूर : राजूर ते दाभाडी मार्गावरील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हायवाचालक वाळू टाकून पसार झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत वाळू हटविण्यात न आल्याने वाहनधारकांना त्रास सोसावा लागला होता. अद्याप वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नसल्याने ही वाळू आली कोठून आणि कोणी आणली? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. याबाबत शनिवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘मुख्य रस्त्यावर वाळू टाकून हायवा पसार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन हसनाबाद पोलिसांनी विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवांवर शनिवारी सकाळी कारवाई केली.
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व केदारखेडा येथील गिरजा, पूर्णा नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू होता. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हायवाचालकाने कारवाईच्या भीतीने राजूरजवळील दाभाडी मुख्य रस्त्यावर वाळू टाकली होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाळू घाटांचे लिलाव झालेले नसताना रस्त्यावर वाळू आली कोठून? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने शनिवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन हसनाबाद पोलीस शनिवारी सकाळपासूनच वाळू तस्करांच्या मागावर होते. राजूर ते खामखेडा रस्त्यावर वाळूने भरलेला हायवा (एमएच.२१.बीएफ.४८७४) तर राजूर ते जालना मार्गावर (एमएच. २१.बीएच.२४८९) हायवा मिळून आला. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करून चालक राजू सिद्धार्थ उगले (रा.बावणे पांगरी, ता.बदनापूर), भरत संतुराम कोल्हे (रा. बेलोरा, ता. भोकरदन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली आहे. ही कारवाई हसनाबाद ठाण्याचे सपोनि संतोष घोडके, सहायक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस नाईक गणेश मांटे, संतोष वाढेकर यांनी केली.