अंबड : ग्रामीण भागातील मुलींना अडचणी खूप असतात, त्या अडचणींवर मात करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेत्या तथा उरण येथील उपविभागीय अधिकारी ललिता बाबर - भोसले यांनी केले. अंबड येथे सुरू असलेल्या यशवंत व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक संजय खोरे, डॉ. गोपाल आडानी, डॉ. सविता जाधव, शिवाजी धुपे आदींची उपस्थिती होती.
बाबर म्हणाल्या की, मी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या बाबर वस्ती या छोट्याशा गावातून खेळाला सुरुवात केली. सातत्याने दुष्काळाचे चटके भोगत असलेल्या माण तालुक्यात आपला जन्म झाला. या दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्याला मेहनतीने पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही, हा विचार मनात आला आणि आज कष्टाने ऑलिंपिकपर्यंत पोहोचता आले. अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत झगडत राहिले. अनेकदा विरोध झाला. पण, तरीही निर्धार ठाम असल्यामुळे मी थांबले नाही. आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निर्धार होता. शाळेतील शिक्षक व घरच्यांनी पाठिंबा दिला म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता आले. अडचणी खूप असतात. या अडचणींवर मात करून पुढे जाता येते. आपल्याला पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. आज या खेळामुळेच मला उपविभागीय अधिकारीपदापर्यंत पोहोचता आले, असेही त्या म्हणाल्या.
===Photopath===
220221\22jan_1_22022021_15.jpg
===Caption===
फोटोअंबड येथे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात सहभागी बोलताना ललिता बाबर व इतर मान्यवर दिसत आहे.