जालना : अंबड शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बुधवारी अंबड- पैठण रस्त्यावर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु, या पाईपलाईनच्या दुरूस्तीला दोन- तीन दिवस लागणार असल्याने यादरम्यान शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पैठण पाईपलाईन यापूर्वीही रस्ता रूंदीकरणाच्या कामामुळे फुटलेली आहे. त्यामुळे शहरातील पाणी वितरणावर मोठा परिणाम झालेला आहे. या रस्ता रुंदीकरण कामात बुधवारीही ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याचे समजताच नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पाईपलाईनचे नुकसान करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुरुस्तीसाठी दोन- तीन दिवस लागणार असल्याने शहरातील पाणी वितरणावर याचा परिणाम होणार आहे.
लवकरच दुरुस्ती
फुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. ही दुरूस्ती एक किंवा दोन दिवसांत पूर्ण होईल. पाईपलाईन फुटल्याने पाणी वितरणावर परिणाम होणार आहे. असे असले तरी अधिकाधिक लवकर हे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
पूनम राज स्वामी
सभापती, पाणीपुरवठा