जालना : जिल्ह्यातील माव ते पाटोदा रस्त्याचे काम न करताच बिल उचलून घेतल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
सोळंके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील माव ते पाटोदा रस्ता पाटोदा येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता काही दिवसापूर्वी करण्यात आला होता, परंतु रस्त्याचे काम कागदोपत्री दाखवून संबंधित गुत्तेदार व उपअभियंता यांनी संगनमताने पूर्ण बिल उचलून घेतले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच रस्त्याचे काम नव्याने करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.