राणीउंचेगाव येथे पशुपालकांना मार्गदर्शन
राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील पशुपालक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यात आयोजित कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच विठ्ठल खैरे, धनंजय सावंत, परिचर इंगळे यांच्यासह शेतकरी, पशुपालकांची उपस्थिती होती.
दोन हजार शेतकऱ्यांचे नुकसान अनुदान प्राप्त
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत दोन हजार २०८ शेतकऱ्यांचे एक कोटी ४२ लाख ७९ हजार ३४ रुपयांचे नुकसान अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून, गावनिहाय वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांनी सूचनांचे पालन करून अनुदान रक्कम खात्यावरून उचलावी, असे आवाहन बँक प्रशासनाने केले आहे.
बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात
अंबड : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराई पडत आहे. रोगराई दूर व्हावी, यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. रोगराईमुळे उत्पन्नात घट होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, भांडण तंट्यात वाढ होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.