अंबड : शहरासह ग्रामीण भागातील विजेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दिवसरात्र वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागात रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांना विजेअभावी पाणी देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
विम्यासाठी उपोषण
तीर्थपुरी : पुणे येथील कृषी कार्यालयासमोर भोगगाव येथील शेतकरी सुधीर मुळे यांनी विमा कंपनीकडून कापूस व सोयाबीन या पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सोमवारी उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक यांनी ही निवेदन देण्यात आले होते.
लसीकरण मोहिमेअंतर्गत कार्यशाळा
मंठा : तालुक्यात कोविड आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमेच्या पूर्व तयारीबाबत ढोकसाळ येथील आरोग्य केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. पोलिओ लसीकरण मोहिमेत १७ जानेवारील ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात येणार आहेत, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक लोणे यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. माधुरी बचाटे, आरोग्य सहाय्यक भारत गागुर्डे, सुजित वाघमारे हजर होते.
सुखापुरीत ४३१ जणांची नेत्र तपासणी
अंबड : तालुक्यातील सुखापुरी येथे नवदृष्टी अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४३१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६१ मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता निदान झाले. या सर्व व्यक्तींवर पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी देसाई हॉस्पिटल डॉ. साठे. डॉ. यादव, डॉ. भोकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, पंचायत समिती उपसभापती रईस बागवान आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी शिंदे
जालना : संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी बोलेगाव येथील महादेव तुकाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनसावंगी येथे जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिंदे तसेच तालुका कार्याध्यक्षपदी अनंता शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी बाळासाहेब बरसाले, महेश शिंदे, योगेश पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सुखदेव काळे, त्वरित शिंदे, अविनाश भुतेकर, लक्ष्मण शिंदे आदींची उपस्थिती होती.
बारावी बोर्ड परीक्षा आवेदनपत्र प्रक्रिया
जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शैक्षणिक वर्षाचे नियोजन यासह दहावी-बारावी बोर्ड परीक्षा नियोजन विस्कळीत झाले आहे. बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची धावपळ दिसून येत असल्याचे चित्र आहे.