जाफराबाद : शहरांतर्गत भागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधितांनी शहरांतर्गत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
अंबड : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
घनसावंगी : शहरासह परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरठ्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सानेगुरूजी कथा मालेतर्फे भेट
जालना : येथील घायाळनगर भागातील लोकमान्य विद्यालयास अखिल भारतीय सानेगुरूजी कथा मालेच्या जिल्हा शाखेच्या वतीने पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. यावेळी कथामालेचे जिल्हाप्रमुख डाॅ.सुहास सदावर्ते, विजय उबरहंडे, नारायण भुजंग, भगवान घोगरे, सुरेश घायाळ, संदीप राठोड, गजानन पुरोहित, शरद ढवळे, राजेश वानखेडे आदींची उपस्थिती होती. युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन संस्थेने एकत्र येऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी समकालनी वाचन चळवळ सुरू केली असल्याचे डॉ.सदावर्ते म्हणाले.
तालुकाउपाध्यक्षपदी भगवान शिंदे
जालना :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बदनापूर तालुका उपाध्यक्षपदी भगवान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ.निसार अहमद देशमुख यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
जालना : जालना शहरातील मामा चौक येथील अधिकृत दर्गा तोडणारे तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर व अशोक लोंढे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेख सलाम शेख सलीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
बोगस डॉक्टरांची चौकशी करा
जालना : मंठा तालुक्यातील बोगस डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भगवान जाधव यांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बॉगस डॉक्टरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दुभाजकांमध्ये माती भरण्याचे काम सुरू
जालना : जालना शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या रिंग रोडवरील दुभाजकांमध्ये पथदिवे उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुभाजकांमध्ये वृक्षारोपणही केले जात आहे. या अनुषंगाने दुभाजकांमध्ये माती टाकून वृक्षारोपण केले जात आहे. सध्या देऊळगावराजा रोडवर फुलांच्या झाडांची लागवडही झाली आहे, परंतु जालना, अंबड, मंठा चौफुलीकडील या मार्गांवर हे काम केले जात आहे.
विशाल ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक
जालना : शहरात २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशाल ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बारा बलुतेदार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बैठक पार पडली. जुना जालना भागातील सराफानगरमध्ये असलेल्या भगवान सेवा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत ओबीसी मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
श्रीरामचंद्रांचे मंदिर विश्वाला संस्कार देणारे ठरेल : खरे
जालना : अयोध्येत बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य सुनील रूपा पहेलवान खरे यांनी सांगितले. अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा रॅलीचा शुभारंभ श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून खरे यांच्या हस्ते रविवारी जालना शहरात करण्यात आला.