परतूर : शहरातून धुळे येथे ट्रकद्वारे पाठविलेले दोनशे क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची तक्रार परतूर पोलिसांत व्यापाऱ्याने दिली आहे. परतूर येथील होलानी ट्रेडिंग कंपनीचे मालक तथा परतूर बाजार समितीचे माजी उपसभापती दिनेश होलानी यांना खरेदी केलेला २०० क्विंटल सोयाबीन धुळे येथील एका कंपनीला पाठवायचे होते. त्यासाठी त्यांनी शहरातील रोशन ट्रान्सपोर्टचे नटवर खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सोयाबीन घेऊन ट्रक धुळ्याकडे रवाना झाला. हा ट्रक सोमवारी दुपारपर्यंत धुळे येथे पोहोचणे अपेक्षित होते. परंतु,तो पोहोचला नाही.
जालन्यात २६ जणांवर कारवाई
जालना : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांनी यापूर्वीच दहा वाजेची मुदत दिली होती. त्या मुदतीनंतर दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणे तसेच परवाना नसणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करणाऱ्या २६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक यशवंत जाधव आणि सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
घनसावंगी तालुक्यात रक्तदान शिबीर
तीर्थपुरी : मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि एकता सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तीर्थपुरी, रांजणी, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी येथे हे शिबीर होणार आहे. रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कुंभार पिंपळगाव : येथील मीनाक्षी जिनिंग सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची आणि बैलगाड्यांची मोठी गर्दी होत आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांनी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घाई करू नये, म्हणून आता ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू राहील, असे सीसीआयचे केंद्रप्रमुख पवन बोबडे यांनी कळविले आहे. येथील कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आढळले ४११ क्षयरुग्ण
जालना : कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ४११ क्षयरुग्ण तर ७८ कुष्ठरुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अश्वमेध जगताप यांनी शुक्रवारी दिली. या अभियानाअंतर्गत १७ लाख ५२ हजार २९५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सहा हजार ६३८ संशयित क्षयरुग्ण आढळून आले. त्यापैकी सहा हजार ४८९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली.
खोट्या स्वाक्षऱ्या करून फसवणूक
जालना : विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेले बँक पासबुक व इतर बँकेविषयक कागदपत्रांच्या आधारे बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक करणाऱ्या एका संशयिताविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत केशवराज जाधव (रा. जवाहर कॉलनी औरंगाबाद) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. संशयित कांतराव राणुजी वाहुळे (रा. बोलेगाव) याच्याकडे विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेले बँकेसंबंधी कागदपत्रांचा दुरूपयोग करून बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.
वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई
परतूर : शहरात भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर परतूर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. येथील रेल्वेस्टेशन परिसर, महादेव चौक, शिवाजी चौक परिसरात सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी पोलीस फौजफाटा घेवून ही कारवाई केली. त्यांनी भरधाव वाहन चालविणारे, लायन्सेस नसलेल्या अनेक वाहनधारकांवर कारवाई करीत दंड आकारण्यात आला. ही कारवाई आयपीएस गौहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ज्वारीचे पीक जोमात
तीर्थपुरी : सुखापुरी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करीत ज्वारीची पेरणी केली होती. सध्या बेलगाव शिवारात ज्वारीचे पीक जोमात आले आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
विविध मागण्यांचे निवेदन
जालना : हिंगोली येथील नगरपरिषदेचे प्रशासक अधिकारी रामदास पाटील यांची चौकशी करावी, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॅड. रोहित बनवसकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
ठाकूर यांना पुरस्कार
अंबड : पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्था भारत यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२० यावर्षी अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक दिनेश ठाकूर यांना जाहीर झाला. या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले.
डीपी रोडवर खड्डे
जालना : जुना जालन्यातील उड्डाणपुलाखाली अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते मुक्तेश्वरद्वारापर्यंत येणाऱ्या डीपी रोडवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे.