जालना : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात जालना येथील अनेकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती सीटूचे राज्य पदाधिकारी अण्णा सावंत यांनी दिली आहे . केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
जाफराबाद ते रेपाळा रस्त्याचे काम सुरू
जाफराबाद : जाफराबाद ते रेपाळा या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्त्यावरून वाहने चालवणे ही अवघड झाले होते. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पराडा- सकलादीबाबा रस्त्याची दुरूस्तीची मागणी
जालना : अंबड तालुक्यातील पराडा ते सकलादीबाबा दर्ग्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर अब्दुल रफीक चौधरी, फारूक सय्यद रफीक, जुनेद सय्यद आदींची उपस्थिती होती.
वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन
जालना : जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी शासनासह सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून येथील क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या फिरत्या समुपदेशन केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसह महिलांमध्ये आत्महत्या न करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समुपदेशक उषा शिंदे, अयोध्या टेमकर, गजानन गाढे आदींची उपस्थिती होती.
किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन
मठपिंपळगाव : अंबड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात मुलामुलींना आरोग्यासंबंधीच्या समस्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण महिती दिली. त्याचबरोबर किशोर मुलींमध्ये वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक मानसिक बदल, मासिक पाळी, कमी वयात लग्न केल्यानंतर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, व्ही. निंबाळकर, जाधव, भद्रे आदींची उपस्थिती होती.
पारध परिसरात पेरूला फटका
भोकरदन : तालुक्यातील पारध व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पेरूला गळती लागल्याने केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सुखापुरी परिसरात अद्रकला पसंती
अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात अद्रकचे पीक जोमात आले आहे. बोरवेल, विहिरीत मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी यंदा गहू, हरभरा या रब्बीच्या पिकाबरोबर अद्रक, हळद या पिकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना यंदा ही पिके तारणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.
आदर्श फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदर्श फाउंडेशन या सामाजिक संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जालनाच्या शासकीय रक्तपेढीने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी आदर्श कॉलनीतील जगन्नाथ मामा वाजे, अशोक सावंत, सोमनाथ सवणे, जनार्दन बोबडे, माऊली जाधव, अजय अंधारे, विलास एसलोटे, अशोक वाजे, जगदीश सवणे, योगेश मुळे, अशोक घाडगे, दीपक नाईकवाडे उपस्थित होते.
परतूर येथे बैठक
परतूर : राज्यातील चर्मकार समाज गेल्या अनेक वर्षांपासून न्याय व हक्कापासून वंचित राहिलेला आहे. या समाजाच्या हक्कासाठी संघटित होऊन लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राजू बासनवाल यांनी परतूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
परतूर : तालुक्यातील अगलगाव येथे खंडोबा मंदिरात ग्रामस्थांनी महादेव नंदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी जय मल्हारचे अध्यक्ष लिंबाजी सुखदेव दिवटे, उपाध्यक्ष लक्ष्मण दिवटे, सचिव पांडुरंग शिंदे, बाळू शिंदे, शांताराम शिंदे आदींची उपस्थिती होती.
रस्त्याची दुरवस्थ
जालना : तालुक्यातील बाजीउम्रदकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.