शेतकरी चिंतेत :
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात मोसंबीचा अंबिया बहर चांगलाच बहरला आहे; परंतु, अंबिया बहारावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
घनसावंगी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. शेतकऱ्यांनी मोसंबीचा अंबिया बहर फुटण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करून झाडांना पाण्याचा ताण दिला होता. त्यातच मागील आठ दिवसांपासून बहुतांश शेतकऱ्यांनी झाडांना खताची मात्रा देऊन पाणी देण्यास सुरूवात केली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अंबिया बहर फुटत असतो. यंदाही बहुतांश ठिकाणी अंबिया बहर फुटला आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी मोसंबीवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे अंबिया बहर धोक्यात सापडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे.
यंदा जूनच्या सुरूवातीपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. परंतु, अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात होते. आता शेतकऱ्यांची मदार रब्बीच्या पिकांवर होती. परंतु, वातावरणातील बदलामुळे रब्बीची पिके धोक्यात सापडली आहे. मोसंबीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
बहुतांश ठिकाणी मोसंबीच्या कोवळ्या पानांवर माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा फारसा परिणाम पिकावर होत नाही. शेतकऱ्यांनी माव्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारात मिळत असलेल्या चिकट पट्ट्या झाडावर लटकाव्यात.
राम रोडगे, तालुका कृषी अधिकारी, घनसावंगी