बाजारपेठेत गर्दी; सूचनांकडे होतेय दुर्लक्ष
अंबड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. असे असले तरी मास्कचा वापर, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, शहरातील बाजारपेठेत होणारी गर्दी आणि सूचनांकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे कोरोचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका
जालना : गत काही दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण आणि पावसाचा झालेला शिडकाव यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पिकांवर अळ्यांसह रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
ट्रॅक्टर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी
परतूर : येथील दिंडी मार्गावरील साईनाथ मंदिरासमोर सोमवारी सकाळी कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या ट्रॅक्टरच्या अपघातामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. या भागात सतत पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी होत आहे.
खंडित वीजपुरवठा; ग्राहकांची गैरसोय
बदनापूर : शहरासह परिसरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. अचानक वीज गुल होत असल्याने लघु व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.