जालना : पाणी घेऊन घराकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच चार हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
रोहित उर्फ डिच्या नाना कांबळे (रा.गांधीनगर, जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एक अल्पवयीन मुलगी २१ जून, २०१४ रोजी सायंकाळी पाणी घेऊन घराकडे जात होती. त्यावेळी रोहित कांबळे याने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून कांबळे विरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी बी.आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणाची विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स.गो. देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व विशेष सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश स.गो. देशमुख यांनी आरोपी रोहित कांबळे याला कलम ३५४ भादंविनुसार दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ७, ८ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तसेच दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी दिली.
यांची साक्ष महत्त्वाची
या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, तिची आई, घटनास्थळावरील साक्षीदार, पंच साक्षीदार, तसेच तपासाधिकारी बी.आर. पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली.