जालना शहरातील आझाद मैदान येथील घटना : मेसवाल्यामुळे कळाली घटना
जालना : जालना शहरातील आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या एका घरात कुजलेल्या अवस्थेत ७२ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली. डॉ.सुभाष सुकलाल दिव्यवीर (७२ रा. आझाद मैदान, जालना) असे मयत इसमाचे नाव आहे.
डॉ.सुभाष दिव्यवीर यांना तीन मुले आहेत. एक मुलगा विदेशात तर एक मुलगा नांदेड येथे राहतो, तसेच त्यांची मुलगी ही चेन्नई येथे राहते. त्यांची पत्नीही गेल्या अनेक महिन्यांपासून चेन्नई येथे मुलीकडे गेली होती. त्यामुळे डॉ.सुभाष दिव्यवीर हे एकटेच घरात राहत होते. त्यांनी एका मेसवाल्याकडे जेवणाचा डबाही लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्री मेसवाला दिव्यवीर यांच्याकडे डबा देण्यासाठी गेला असता, त्यांना डबा भरलेला दिसला. मेसवाल्याने सुभाष दिव्यवीर यांना आवाज दिला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर, मेसवाल्याने घरात जाऊन पाहिले असता, दिव्यवीर यांचा मृत्यू झाल्याचे समजले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्याने याची माहिती पोलिसांना दिली. महिती मिळताच, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि. संजय देशमुख यांच्यासह परशराम पवार, समाधान तेलंग्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
पोलिसांनी लगेचच सुभाष दिव्यवीर यांच्या मुलांना याची माहिती दिली. त्यानंतर, नांदेड येथील मुलगा उदय दिव्यवीर हे शनिवारी जालना येथे दाखल झाले. या प्रकरणी उदय दिव्यवीर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. पवार हे करीत आहेत.