जालना : नगरपालिकेची थकबाकी असलेल्या गाळेधारकांना मालमत्ता कर विभागाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. कराचा वेळेत भरणा न केल्यास जप्तीची नोटीस देऊन कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जालना नगरपालिकेचे जवळपास २६० गाळेधारक आहेत. यातील अनेक गाळेधारकांकडे जुनी थकबाकी आहे, तर काही गाळेधारक चालू थकबाकीत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आता व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील मालमत्ता कर विभागाच्या वतीने थकीत भाडे भरण्यासाठी गाळेधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक गाळेधारकांकडे वर्षानुवर्षापासून भाडे थकीत आहे. अनेकांनी थकीत गाळे भाडे नगरपालिकेकडे भरलेले नाही. अशा गाळेधारकांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुदतीत थकीत भाडे न भरल्यास जप्तीच्या कारवाईची नोटीस देऊन कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नगरपालिकेने आता कारवाईचा बडगा उगारल्याने किती गाळेधारक थकीत कराचा भरणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
...तर कारवाई होईल
नगरपालिकेच्या ज्या गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे, अशांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसीनुसार मुदतीत गाळेभाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
प्रभाकर बोरडे
मालमत्ता कर विभागप्रमुख, नगरपालिका