बनावट मोबाइल कॉलच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती संपर्क साधते. त्यातून बोलत-बोलत माहिती विचारते. त्यानंतर कधी फसवणूक होते, हे कळत नाही. ओटीपीनंबरसमोरील व्यक्तीला सांगितल्यानंतर बँक खात्यातील पैसे परस्पर गायब होतात. अलिकडे ऑनलाइनचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. बँकेतून अधिकारी बोलतोय, अशी बतावणी करत ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनाही गंडविण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
देशभरातून हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींचे कॉल्स प्रामुख्याने बँक ग्राहकांना येतात. फेक कंपन्यांचे नाव सांगून आमिष दाखविल्या जाते.
सोशल मीडियातील वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जाहिराती केल्या जातात. या जाहिरातीला बळी पडलेल्यांना गंडविले जाते. तर बनावट प्रोफाइलवरून फसविले जाते.
हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. काही गुन्हे उघडकीस येतात, तर काही गुन्हे उघडकीस येत नाही. त्यामुळे पैसे मिळणे अवघड होते.
अनोळखी ॲप नकोच
n अनेकवेळा मोफत चित्रपट, गेम डाऊनलोड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याच्या अनेक जाहिरात स्मार्ट फोनवर क्षणात दिसतात. अशावेळी असे ॲप डाऊनलोड करताना आपण चारवेळेस विचार केला पाहिजे.
n वस्तू महागडी असतानाही काही कंपन्या फार स्वस्त दरात आपली वस्तू असल्याचा दावा करतात. अशावेळी ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. प्रथम वस्तू आल्यानंतरच त्याचे पैसे अदा केले पाहिजे.
n ऑनलाइन व्यवहार करताना अनेक वेळा ग्राहकाचा संपूर्ण डाटा हॅकरकडून चोरला जाण्याची शक्यता आहे.
आटीपी दुसऱ्यांना शेअर करू नका
ग्राहकांनी स्मार्ट फोन वापरताना काळजी घ्यावी. कुठलीही प्रलोभने दाखविल्या गेली तर प्रथम ती साईट खरी आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. आपला ओटीपी दुसऱ्यांना शेअर करू नये.
- मारूती खेडकर
पोलीस निरीक्षक, सायबर विभाग.