हसनाबाद : परिसरातील वज्रखेडा खडकी, सिरसगाव, गोषेगाव, खंडाळा व देऊळगाव कमान या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेळीच रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
गुरूदेव विद्या मंदिर शाळेत रक्तदान शिबिर
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरूदेव विद्या मंदिर शाळेत गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक प. पू. पंढरीनाथ शिसोदे यांच्या पुण्यतिथी व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यात जास्तीत- जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले.
भारज परिसरात रब्बी पिकांचे नुकसान
भारज (बु) : जाफराबाद तालुक्यातील भारज (बु) परिसरात सोमवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भारज (बु) परिसरात गव्हाचे पीक चांगले आहे. परंतु, या रिमझिम पावसामुळे हाती आलेले गव्हाचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा भरपूर पाणी असल्याने परिसरात हरभरा, गहू आदी पिकांच्या पेऱ्यात मोठी वाढ झालेली आहे.
नुकसान झाल्यास सूचनापत्रक द्या- शिंदे
जालना : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अधून- मधून रिमझिम पाऊस पडत आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी तूर काढून ठेवली आहे, त्या तुरीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे सूचनापत्रक भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. सूचनापत्रक भरून दिल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास मदत होईल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
सोळा जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात
वालसावंगी : भोकरदन तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या वालसावंगी १७ सदस्यीय ग्रामपंचायतच्या १६ जागांसाठी ४० जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात १९ महिला तर २१ पुरूषांचा समावेश आहे. गावात एकूण तीन पॅनल आहेत. तर केवळ सोंदर्याबाई गवळी यांची गावात एकमेव ग्रा.पं. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले असून, मंगळवारी गावात प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
शौर्य दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
जालना : शौर्य दिनानिमित्त रिबेल फ्रेंन्डस क्लबच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम किरण साळवे यांनी तरूणांना कोणत्याही व्यसनास बळी न पडण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी संभाजी नगर, लक्कडकोट चौक, बसस्थानक रोड येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिमा ठेऊन अभिवादन केले. यावेळी आकाश अर्सुड, सचिन मोकळे, प्रमोद कांबळे, बाबासाहेब सोनवने, रवी काळे आदींची उपस्थिती होती.