माहोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (पुणे) यांच्या वतीने शाहीर सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मध्यंतरी ऑनलाइन पोवाडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाहीर नानाभाऊ परिहार कोनडकर यांनी उत्कृष्ट कला सादर केल्याने त्यांना सर्वोत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.
ग्रा.पं. कार्यालयाची ‘चाय पे चर्चा’
हसनाबाद : येथील ग्रामपंचायतीचे मतदान १५ जानेवारी रोजी होत असून, सध्या गावात निवडणुकीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणुकीत कोणता उमेदवार बाजी मारेल आणि कोणाची हार होईल, हीच चर्चा सध्या गावातील चौकाचौकांसह चहा हॉटेलांमध्ये पहायवयास मिळत आहे. येथील ग्रामपंचायत १३ सदस्यीय असून, ग्रामपंचायतची पाच वॉर्डात विभागणी करण्यात आलेली आहे. गावची लोकसंख्या१० हजार आहे. परंतु, प्रत्यक्ष मतदार नोंदणी ४ हजार ५०० आहे. मागील निवडणुकीत भाजप व काँग्रेसप्रणीत पॅनलमध्ये लढत झाली होती.
पारधमध्ये ३० उमेदवार निवडणूक रिंगणात
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध (बु) येथील ग्रामपंचायतच्या १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. विशेषकरून गावात पाच प्रभाग असून, यात चार क्रमांकाच्या प्रभागात चुरशीची लढत होत आहे. ही ग्रामपंचायत निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, माजी आमदार चंद्रकांत दानवे या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता येते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीने- शिवसेनेशी युती करून त्यांचे १५ उमेदवार निवडून आले होते.