जुना जालना भागातील वैष्णवी व्यापारी संकुलात शुक्रवारी सकाळी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. सामाजाच्या संपर्क कायालयाचे उद्घाटन आ. राजेश राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अंबेकर बोलत होते. या कार्यक्रमास दलितमित्र बाबुराव सतकर, ॲड. शिवाजी आदमाने, ॲड. अशोक तारडे, उद्योजक मनोहर सिनगारे, पांडुरंग क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, अब्दुल बासेद कुरेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अंबेकर म्हणाले, देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मात्र या संख्येच्या तुलनेत आर्थिक तरतूद अत्यंत नगण्य केली जाते. आर्थिक तरतूद कमी केली जात असल्यामुळे ओबीसी समाजाच्या विकासाच्या वाटा खुंटल्या आहेत. या प्रवर्गाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर सरकारने देशभरातील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे काम तातडीने हाती घेण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी आ. राजेश राठोड म्हणाले, ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्याचे काम करू. येत्या २४ जानेवारी रोजी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाल मोर्चात जिल्हाभरातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन आ. राठोड यांनी केले.
तत्पूर्वी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या मोर्चाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. प्रास्ताविक ओबीसी, व्ही.जे.एन.टी. व एस.बी.सी. संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. सूत्रयंचालन कपिल दहेकर यांनी तर नगरसेवक अशोक पांगारकर यांनी आभार मानले.