टेंभुर्णी : आता कुठे ग्रामीण जनता कोरोना आणि लॉकडाऊनच्या जीवघेण्या आठवणी विसरायला लागली होती. परंतु, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, पुन्हा लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू आहेत. या कल्पनेनेच ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले आहेत. लॉकडाऊन लागू नये, यासाठी नागिरकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मागील मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनने अनेकांना अक्षरशः जेरीस आणले होते. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून अनेकांनी आपले घर गाठले. कोरोनाच्या तावडीतून जीव वाचवून घराकडे निघालेल्या काहींना वाटेतच मृत्यूने गाठले. एक नाही अशा शेकडो जीवघेण्या आठवणी आजही ग्रामीण जनता विसरू शकलेली नाही. केवळ आठवणीने अनेकांच्या अंगावर काटा येतो. त्यातच पुन्हा मागचे दिवस पुढे येतात की काय म्हणून ग्रामस्थ चांगलेच धास्तावलेले दिसत आहे. पार आणि चावडीवर सध्या लॉकडाऊन लागतो की काय हीच चिंता ग्रामस्थ एकमेकांना विचारताना दिसत आहेत. हातावरचे पोट असलेल्यांना पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अनेक जण एकमेकांना काळजी घ्या म्हणून विनवणी करीत आहेत. बेफिकिरीने वागणाऱ्यांना जर तुम्ही कोरोनापासून सुरक्षिततेची काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही सांगत आहेत.
चौकट
ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा तेवढा फैलाव झालेला नाही. तेव्हा गर्दी टाळणे, नियमित मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, कुठलाही आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी बाबींचे कडक पथ्य सर्वांनीच पाळले तर कोरोनाला वेशीच्या बाहेरच थोपवू शकतो.