वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मराठा नेत्यांना कुठल्याही प्रकारचा रस दिसून येत नाही. ओबीसी नेते मंत्री विजय वडेट्टीवार हे सत्तेत असूनही उघडपणे ओबीसी आरक्षणासाठी विरोध करतात. याचा आदर्श मराठा नेत्यांनी घेतला पाहिजे. समाजाने मराठा नेत्यांना जाब विचारून मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे परखड मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी मांडले.
अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २० जानेवारीपासून ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की, मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत. हे सत्तेत असून, विरोध करतात. मराठा आरक्षणाबाबत मराठा नेत्यांना जाब विचारला पाहिजे. ते जर जातीसाठी पद सोडण्यास तयार आहे. मग मराठा नेते खुर्चीला का चिटकून बसले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल एकही मराठा नेता कॅबिनेट बैठकीत का बोलत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष कैलास खांडेभराड, जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर, जिल्हा संघटक संभाजी गायके, जालना शहराध्यक्ष संदीप वाघमारे, सरपंच प्रभाकर डोकले, संतोष चाळसे, बाळासाहेब उढाण, झुंजार छावा संघटनेचे पदाधिकारी सुनील कोटकर, निलेश डव्हळे, रवींद्र काळे, अरुण नवले, किरण खरात, संतोष काळे, किशोर चव्हाण आदींची उपस्थिती होती.