लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड बंधनकारक केला आहे. मात्र, शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी या ड्रेसकोडच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत. मोजकेच कर्मचारी ड्रेसकोडचे पालन करत असल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
राज्य सरकारने चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट, जीन्स, रंगीबेरंगी कपडे परिधान करून कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालय प्रमुखांनी आपापल्या कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, या सूचनांचे काही मोजकेच कर्मचारी पालन करत असून, बहुतांश कर्मचारी आजही ड्रेसकोडच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रशासकीय सूचनांचे पालन
जिल्हा परिषद इमारतीतील विविध विभागांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून ड्रेसकोडमध्ये कार्यालयात कार्यरत असल्याचे दिसून आले. काही मोजकेच कर्मचारी आणि काही महिला कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडकडे दुर्लक्ष केल्याचेही पाहायला मिळाले.
केले टार्गेट
जालना शहरातील पंचायत समिती कार्यालय प्रमुखांनी ड्रेसकोडबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु, शुक्रवारी या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांनी शासकीय सूचनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
काहींकडून पालन, काहींचे दुर्लक्ष
तहसील कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली असता, काही मोजक्याच कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडचे पालन केल्याचे दिसून आले. तर काही कर्मचारी ड्रेसकोड व्यतिरिक्त इतर कपड्यांमध्ये दिसून आले. याकडे कार्यालय प्रमुख तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शासन आदेशानुसार आम्ही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड सक्तीचा केला आहे. बहुतांश कर्मचारी ड्रेसकोड सूचनेचे पालन करत आहेत. जे कर्मचारी या सूचनेकडे दुर्लक्ष करतील, अशांवर यापुढे जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय पातळीवर कारवाई केली जाईल.
- सवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संबंधितांना माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी शासकीय सूचनांचेे पालन करून ड्रेसकोडमध्ये कार्यालयात यावे, याबाबतही सूचित केले असून, सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी
कार्यालयीन सर्वच कामे सुरळीत व्हावीत, याकडे वेळोवेळी लक्ष दिले जाते. शासन आदेशानुसार ड्रेसकोडबाबतही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. अनेक कर्मचारी या सूचनेचे पालन करत आहेत. जे कर्मचारी ड्रेसकोडच्या सूचनेचे उल्लंघन करतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
- श्रीकांत भुजबळ, तहसीलदार