देऊळगाव राजा : तिथीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव गुरुवारी सिंदखेडराजा येथील राजवाड्यात साजरा करण्यात आला. २८ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या सूर्योदयसमयी जिजाऊंची महापूजा करण्यात आली.
पौष पैर्णिमेनिमित्त दरवर्षी जिजाऊ वंशजांच्या वतीने या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी कोरोना संकट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. २८ जानेवारी रोजी सूर्योदय समयी राजे लखुजीराव जाधवांचे वंशज, शिवसेना नेते छगन मेहेत्रे व स्थानिक नागरिकांच्या वतीने राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊ जन्मस्थळी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बालाजी संस्थाचे वंशपरंपरागत विश्वस्त विजयराजे जाधव, भागवत राजे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष कमल मेहेत्रे, अनंत खेकाले यांची उपस्थिती होती. पौष पौर्णिमेनिमित्त संपूर्ण राजवाडा परिसर स्वच्छ करून सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती, तर जिजाऊ जन्मस्थळ हार फुलांनी सजविण्यात आले होते. सूर्योदय होताच मंत्रोचारात महापूजा करण्यात आली. महिलांनी जिजाऊ जन्माचे पाळणे गाऊन या उत्सवाला अधिक रंगत आणली.