जालना : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस होण्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने भविष्यात पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन आतापासून केले आहे.
जालना जिल्ह्यात गोदावरी काठावरील ३८ गावे हेे पूररेषेजवळ येतात. त्यामुळे या गावांमध्ये अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. गोदावरीप्रमाणेच जिल्ह्यातील पूर्णा नदीला देखील पूर येण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने त्या त्या तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. पूर नियंत्रण करण्यासाठी पूररेषा निश्चित केली जाते. साधारणपणे नदीपात्रापासून १०० मीटरच्या अंतरावर ही पूररेषा आखली जाते.
जिल्ह्यातील ३८ गावांची पूररेषा निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी आपत्ती निवारण विभागाने सर्व ती तयारी केली आहे. सरासरी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यादृष्टीने लागणारे सर्व बचाव साहित्याची जुळवाजुळव पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले.
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यातील गोदावरी आणि पूर्णा नदीपात्रांजवळील जवळपास ३८ गावांमधील ८०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्राला नदीपात्रातून पाणी गाव, शेतात घुसल्यास फटका बसू शकतो. त्यादृष्टीने या भागातील शेतकऱ्यांना २४ तास आधीच सतर्क केले जाते. मध्यम आणि मोठ्या जलसाठ्यांमधील पाणी पातळीची नोंद ही तातडीने घेऊन त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.
यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. असे असले तरी जोपर्यंत जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात नाही. तोपर्यंत जिल्ह्याला पुराचे संकट खूप कमी असते, तरीदेखील आम्ही खबरदारी घेऊन सर्व ते बचाव साहित्य उपलब्ध केले आहे.
-केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी
शहरातील धोकादायक इमारतीची सर्वेक्षण सुरू
जालना शहरातील धोकादायक इमारतींचे जालना पालिकेकडून स्वतंत्र सर्वेक्षण केले जात आहे. येत्या पंधरा दिवसांत याचा अहवाल अपेक्षित आहे.
जालन्याप्रमाणेच पूररेषेजवळील जी ३८ गावे आहेत, तेथील जुने बांधकाम असलेल्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुराचा इशारा दिल्यानंतर त्या भागात न जाण्यासाठी नदीपात्रात धोका दर्शविणारे फलक लावण्याचे निर्देशही दिले आहेत.
अग्निशमन दल सज्ज
जालना जिल्ह्यात जवळपास पाच ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. या दलाकडे अग्निशमन बंबांसह लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.
जालना, अंबड, भोकरदन, परतूर येथे अग्निशमन केंद्र असून अंकुशनगर येथील समर्थ कारखान्याकडेही एक अग्निशमन बंब आहे.
अग्निशमन दलाकडे बंब असले तरी अधिकच्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसून येते.