मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सरस्वती भुवनचे जवळपास शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी गणवेशात आणि आपापल्या सायकली घेऊन शाळेत हजर झाले होते. यावेळी त्यांना जालन्यातील एमआयडीसीत असलेल्या दोन कंपन्यांना भेट देण्याची सूचना याआधीच दिली होती. त्यानुसार एका शिस्तीत हे सर्व विद्यार्थ्यांनी दावलवाडी येथील विनोदराय इंजिनअर्स आणि अतिरिक्त एमआयडीसीत असलेल्या ॲप्रोक्रॉप या कंपन्यांना भेट दिली.
यावेळी विद्यार्थी देखील तेथील अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून हरखून गेले हाेते. अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न बिनधास्तपणे विचारल्याचे दिसून आले.
विनोदराय इंजिनिअर्स कंपनीतून प्लास्टिकच्या टाक्या तयार करणारे मोल्डिंग मशीन तयार होते. या कंपनीने आतापर्यंत जवळपास ६० पेक्षा अधिक देशांत या मशीनची निर्यात केली असल्याचे सांगण्यात आले. तसेच ॲप्रोक्रॉप कंपनीत संचालक जितेंद्र राठी व अन्य अधिकाऱ्यांनी एसीची यंत्रणा तयार कशी होते याची माहिती दिली. यासाठी शाळेतील शिक्षक सुभाष देठे, पवार, जहागीरदार यांची उपस्थिती होती.
चौकट
चीनच्या मालाबद्दल विद्यार्थ्यांची शपथ
चीनने आज विविध क्षेत्रांत जगाला लावजेल अशी प्रगती करून भारतातील जवळपास सर्वच क्षेत्रांतील मार्केटमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. त्यामुळे त्यांच्या मालावर बहिष्कार घालणे ही बाब स्पर्धेच्या युगात तेवढी खरी ठरणार नाही; परंतु विद्यार्थ्यांनी चीनची वस्तू कुठेही दिसल्यास त्यापेक्षा चांगल्या वस्तूची निर्मिती आपण कशी करू शकू, याचा विचार करणार, अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमके काय, याची माहिती उद्योजक तथा या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील रायठठ्ठा यांनी दिली.