भोकरदन : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालात मतदारांनी प्रस्थापितांना धोबीपछाड देऊन मातब्बर नेत्यांना धडा शिकवून नवख्यांना संधी दिली आहे. भाजपने धावडा, आव्हाना, हसनाबाद, केदारखेडा, वाकडी, लिंगेवाडी हे गड अबाधित ठेवले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसने पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, सिपोरा बाजार, फत्तेपूर, सुरंगळी, आडगाव, कठोरा बाजार या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून हिसकवल्या आहेत. शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव यांनी पारध (बु.) ग्रामपंचायत पुन्हा एकदा ताब्यात ठेवली आहे. जानेफळ गायकवाड, कोदा हे गड सेनेने कायम राखले आहेत. काँग्रेसने बाभूळगाव ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. बरंजळा साबळे ही ग्रामपंचायत अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या ताब्यातून हिसकावली आहे. पिंपळगाव सुतार येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या पॅनेलचा विजय झाला. तर कोपर्डा गावात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष त्रिंबक पाबळे यांच्या पॅनेलचा पराभव झाला. भायडी ग्रामपंचायत केशव जंजाळ यांनी ताब्यात ठेवली आहे. बाभूळगाव ग्रामपंच्यात काँग्रेसच्या विशाल गाढे यांनी भाजपच्या ताब्यातून घेतली आहे.
येथील नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात ९१ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर ८६ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले होते. प्रथम आव्हाना ग्रामपंचायतीचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाचीचा कोळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्याच उमेदवाराने पराभव केला. जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई पांडे यांनी दगडवाडी ही ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेतली आहे. वडोद तांगडा गावात सुद्धा राष्ट्रवादीचे पॅनेल निवडून आले. कोदोली गावात भाजपाचे पॅनेल विजयी झाले. भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या २० वर्षांपासूनची ताब्यातील पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत राष्ट्रवादीने ताब्यात घेतली.
भाजप युमोचाचे तालुकाध्यक्ष दीपक जाधव यांच्या ताब्यातील सुरंगळी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे विनोद जाधव यांनी ताब्यात घेतली. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ यांनी जळगाव सपकाळ ही भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायत ताब्यात घेतली. लक्ष्मण ठोबरे यांनी भाजपची जवखेडा ठोंबरे ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतली. हिसोडा ग्रामपंचायत भाजपाचे कृउबाचे सभापती कौतीक जगताप यांनी ताब्यात घेतली. लिंगेवाडी ग्रामपंचायत भाजपच्या कमलाकर साबळे यांनी कायम ताब्यात ठेवली. चिंचोली ग्रामपंचायत शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधवराव हिवाळे यांच्या पॅनेलचा पराभव करून भाजपाने ताब्यात तर फत्तेपूर ही ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या रमेश बरडे यांनी ताब्यात घेतली आहे.
चौकट
आमदार संतोष दानवे म्हणाले, या ग्रामपंचायत निवडणुकीत भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मतदारांनी भाजपच्या बाजूने चांगला काैल दिला आहे. भोकरदन तालुक्यात ९१ पैकी ६६ व जाफराबाद तालुक्यात १७ पैकी १३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा आमदार दानवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले, यावेळी मतदारांनी आमच्या बाजूने काैल दिला आहे. विरोधकांकडे सर्व सत्ता, असतानासुद्धा पिंपळगाव रेणुकाई, कठोरा बजार, जळगाव सपकाळ, फत्तेपूर, वालसावंगी, आन्वा, अलापूर, सुरंगळी या महत्त्वाच्या ग्रामपंचायती आमच्या पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. एकूण ५१ ग्रामपंचायतींवर आमच्या पक्षाचा वरचष्मा असल्याचेही ते म्हणाले.