परतूर : व्याजाच्या पैशासाठी एका डॉक्टराला चाकूचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या दोघांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी परतूर- वाटूर मार्गावरील रोहिणा शिवारात घडली. घटनेनंतर परतूर पोलिसांनी दोन तासांतच दोन्ही आरोपींना जेरबंद करून डॉक्टरांची सुटका केली.
शहरातील डॉ. हिरालाल नागोराव जाधव हे शनिवारी दुपारी महिला रुग्ण व बाळाला घेऊन उपचारासाठी जालना येथे जात होते. परतूर- वाटूर रोडवरील रोहिणा शिवारात जसपालसिंग जुनी व जयपाल जुनी (रा. शिकलकरी गल्ली, परतूर) यांनी ती रुग्णवाहिका अडविली. त्यावेळी डॉ. जाधव यांचे अपहरण केले. त्या दोघांनी जाधव यांना स्वत:चे घरी नेऊन व्याजाने घेतलेले ५० हजार रुपये व्याजासह १५ लाख रुपये देण्याची मागणी करीत मारहाण केली.
रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने जालना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती पुणे येथे मुख्य कार्यालयास दिली. पुणे कार्यालयाने परतूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक गौर हसन, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ठाकरे, के. व्ही. अंभुरे, पोहेकॉ. राजेश शिंदे, गणेश शिंदे, आबासाहेब बनसोडे, नितीन वाघमारे, ओम सुरसुरवाले, कल्पेश ठाकूर यांनी दोन तासांत आरोपींचा छडा लावत अपहरण झालेल्या डॉ. जाधव यांची सुटका केली. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.