लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे महोत्सवाचे उत्तम नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.शहरात १८ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जालना महोत्सव २०१८ च्या पूर्वतयारीनिमित्त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, प्रभारी जिल्हाधिकारी पी. बी. खपले, पोलीस अधीक्षम रामनाथ पोकळे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उद्योजक घनशाम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, गोविंदप्रसाद मुंदडा, सुदेश करवा, वीरेंद्र धोका यांची प्रमुख उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, मागील अनेक वर्षांनतर शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा हा महोत्सवाचा उद्देश आहे. सर्व जाती-धर्माच्या गुरुंना महोत्सवात सहभागी करुन घेत आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ होणे अपेक्षित आहे. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जगाच्यापाठीवरील कलाकृतींची महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हावासियांना ओळख होणार आहे.स्थानिक कलावंतांना यातून चांगली संधी मिळेल. महोत्सवाचा लाभ जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही घेता यावा यासाठी महोत्सवाच्या प्रचार, प्रसारावर भर देण्यासाठी समाजमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग करण्याची सूचना त्यांनी केल्या.अन्य उपस्थितांनी या वेळी आपल्या सूचना मांडल्या. वीरेंद्र धोका यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. तर डॉ. फड यांनी आभार मानले. बैठकीस महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हावासियांसाठी जालना महोत्सव ठरणार पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:48 AM