जालना : जिल्ह्यात दुसºया दिवशीही संततधार पाऊस सुरू होता. मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी सूर्यदर्शन झालेच नाही. आज दिवसभरात सरासरी ११.८५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे. काही वेळ पावसाचा जोर थोडा वाढतही आहे. पावसामुळे हवेत गारवा वाढला असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करीत आहेत. जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी ८४.८३ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. जालना शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने तेथून नागरिकांची फजिती झाली. पावसामुळे अनेकांनी छत्री, रेनकोटचा वापर केला होता. काही भागात चिखल निर्माण झाल्याने नागरिकांची फजिती झाली होती. जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ७२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. बुधवारी जालना तालुक्यात १०.१३ मि.मी. पाऊस झाला. भोकरदन २१.६३, जाफराबाद १६.२०, बदनापूर १०.६०, परतूर १३.२०, अंबड ८.५७, घनसावंगी ५.७१ तर मंठा तालुक्यात ८ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद परतूर तालुक्यात १४२.८ मि.मी. एवढी झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात ४७ मि.मी. एवढी झाली आहे. याशिवाय जालना १०३.०१, भोकरदन ११८.२९, जाफराबाद ७४.२, बदनापूर ५०.४, अंबड ७३.४१, घनसावंगी तालुक्यात ६९.४१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही
By admin | Updated: July 24, 2014 00:15 IST