जालना : कोरोनामुळे शेतातील भाजीपाला, फळांची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. त्यानुसार केलेल्या आवाहनानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे कठीण काळातही शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले. तुरीसह आता हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट फोफावत असून, पुन्हा कठीण स्थिती निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांना अडणीत येऊ देणार नाही, असे आवाहन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सभापती खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती भास्कर दानवे, संचालक श्रीकांत घुले, अनिल सोनी, वसंत जगताप, भाऊसाहेब घुगे, सुभाष बोडखे, बाबासाहेब खरात, कमलाकर कळकुंबे, रमेश तोतला, गोपाल काबलिये, मधुकर मोठे, विष्णू चंद, कैलास काजळकर, तुळशीराम काळे, प्रल्हाद मोरे, अक्षय पवार, पंडित भुतेकर, अभिमन्यू खोतकर, जयप्रकाश चव्हाण, पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती.
सध्या कोरोनाचा संसर्ग गुणाकार पद्धतीने वाढत आहे. ग्रामीण पातळीवरील कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत लस आली असली, तरीही विषाणूचे स्वरूप बदलल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी. आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवल्यास बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही खोतकर यांनी दिली. प्रास्ताविक संचालक भाऊसाहेब घुगे यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना उपस्थतांनी मान्यता दिली. सूत्रसंचालन भाऊसाहेब घुगे यांनी केले, तर संचालक वसंत जगताप यांनी आभार मानले. यावेळी अनिल खंडाळे, मोहन राठोड, संजय छबीलवाड, प्रफुल्ल हिवरेकर, कैलास चव्हाण, तनपुरे यांच्यासह व्यापारी, हमाल, मापाडी, सभासद शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.
चौकट...
शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या योजना आखत मागील दहा वर्षांपासून अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची सुरू असलेली वाटचाल यामुळे मराठवाड्यात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा नावलौकिक झाल्याचे उपसभापती भास्कर दानवे यांनी सांगितले. लॉकडाऊच्या काळात खोतकर यांनी वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. अडचणी उद्भवल्यास व्यापारी व हमाल यांच्या समन्वयातून तोडगा काढत खोतकर यांनी सुरळीतपणे बाजार समितीचा कारभार चालवल्याचेही दानवे म्हणाले.