जालना : जिल्ह्यातील १५१५ जणांची रविवारी आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत केवळ सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.४० आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या १७ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात आरटीपीसीआरच्या १३१०, तर अँटिजनद्वारे २०५ जणांची तपासणी करण्यात आली. आरटीपीसीआरमध्ये सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अँटिजनमध्ये एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. बाधितांमध्ये जालना तालुक्यातील नाव्हा येथील एकाचा समावेश आहे. घनसावंगी शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर जिल्ह्यातील बुलडाणा दोन, बीड येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या ७६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर अलगीकरणात, तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ३१०वर गेली असून, त्यातील ११७१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हजार ६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, अंबड शहरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील संस्थात्मक अलगीकरणात १३ जणांवर उपचार केले जात आहेत.
सहा तालुके निरंक
जिल्ह्यातील आठपैकी जालना आणि घनसावंगी तालुक्यात रविवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर मंठा, परतूर, अंबड, बदनापूर व जाफराबाद या सहा तालुक्यांत दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नाही. रुग्णांची संख्या घटली असली तरी नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.