फोटो
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील झोपडपट्टी (समतानगर) परिसरातील जळालेले गट्टू बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची गत वीस दिवसांपासून होणारी गैरसोय दूर होणार आहे.
धावडा येथील समतानगर भागातील रोहित्रावरील दोन गट्टू वीस दिवसांपूर्वी जळाले होते. तर तिसरा गट्टू जळाल्याने या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे ३७५ घरांतील वीज मीटरचा भार एकाच रोहित्रावर आला होता. त्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित होत होता. त्यात तिन्ही गट्टू जळाल्याने या भागात गत वीस दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. समतानगर भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी येथील वीज कर्मचाऱ्यांनी शेतातील थ्री फेज रोहित्रावरून वीज जोडणी केली होती; परंतु कमी- जास्त दाबामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याने ग्राहकांना मनस्ताप होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत होती.
जळालेले गट्टू भोकरदन येथील विद्युत मंडळात नेण्यात आले होते. मात्र, ऑइल नसल्याचे कारण सांगून ते दुरुस्त केले जात नव्हते. अखेर ग्रामस्थांचा रेटा पाहून रविवारी कर्मचाऱ्यांनी जळालेले गट्टू दुरुस्त करून बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी वीज कर्मचारी रामेश्वर धनवई, श्रीकृष्ण शेजोळ, सय्यद अझरोद्दीन, पवन धनवई, इब्राहीम सय्यद यांनी हे गट्टू बसवून वीज पुरवठा पूर्ववत केला.
मंजूर रोहित्र बसविण्याला मिळेना मुहूर्त
दोन वर्षांपूर्वी येथे नवीन रोहित्रला मंजुरी मिळाली आहे; परंतु तो बसविण्यात का येत नाही? याचे उत्तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडेही नाही. सतत निर्माण होणारी वीज समस्या तातडीने सोडविण्यासाठी नवीन वाढीव रोहित्र बसवावे, अशी मागणी होत आहे.