जालना : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात तेलबियांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी रबी हंगामात केवळ ४८ हेक्टरवर असलेले तेलबियांचे क्षेत्र यंदा १ हजार ३६ हेक्टरहून अधिक झाले आहे. यात करडईचा पेरा २९२.०९, तर जवस १०३.०६ हेक्टरवर आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा १ लाख ३८ हजार ६४ हेक्टरवर होता. भुईमूग १,४२७, तीळ १२६, जवस ११, सूर्यफूल २४.०८ व इतर तेलबियांचे क्षेत्र १८ हेक्टरवर होते. रबीत केवळ ४१ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता, तर उन्हाळी हंगामात भुईमूग २,०१८.९, सूर्यफूल ३०, तीळ ९ व इतर १४, असा एकूण १ लाख ४१ हजार ७८२ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता. एकूणच गतवर्षी खरीप, रबी व उन्हाळी या तीन हंगामांमध्ये तेलबियांचे पीक घेऊनही यंदा खरीप व रबी या दोन हंगामांमध्येच त्यात ६,२०८ हेक्टरवर वाढ झाली आहे. यंदा रबी हंगामात करडई व जवस यांचा पेरा वाढावा, यासाठी मध्यंतरी कृषी विभागाच्या आत्माच्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती. यात प्रत्येक तालुकानिहाय २५ शेतकऱ्यांची करडई व २५ शेतकऱ्यांची जवस पीक लागवडीसाठी निवड करून त्यांना प्रत्येकी करडईचे पाच किलो, तर जवसाचे चार किलो बियाणे पेरणीसाठी मोफत देण्यात आले होते.
कऱ्हाळ पीक हद्दपारीच्या मार्गावर
जिल्ह्यातून कऱ्हाळ पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामात केवळ ६ हेक्टरवर कऱ्हाळाचे पीक घेण्यात आलेले आहे. यापाठोपाठ १० हेक्टरवर सूर्यफूल, तर १५७ हेक्टरवर तिळाचे पीक घेण्यात आले आहे. सर्वांत जास्त १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता; परंतु संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनवर केलेला खर्चही वसूल झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा मनाशी धरून पिकांवर मोठा खर्च केलेला आहे.
कोट
जालना तालुक्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी यंदा तेलबियांची पिके घ्यावीत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तेलबियांच्या पिकांचा होत असलेला फायदा सांगून पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याने तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
-अजय सुखदेवे,
मंडळ कृषी अधिकारी, गोलापांगरी
इतर पिकांसोबत खरीप व रबी हंगामात आम्ही काही प्रमाणात तेलबियांची पिके घेतो. तेलबियांची पिके घेतलेल्या जमिनीवर इतर पिके चांगली येतात. त्यामुळे आम्ही दरवर्षी प्राधान्याने कमी- अधिक प्रमाणात तेलबियांचे पिके घेतो; परंतु ही पिके घेताना मिश्र पद्धतीने पिके घेण्यात भर दिला जातो. जेणेकरून ज्वारी पिकात काही प्रमाणात जवस व करडईचे उत्पादन घेतले जाते.
-संगाधर सांगोळे, शेतकरी