जालना जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटी बसने प्रवास करीत होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन केल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली. लॉकडाऊनमुळे सर्वच बसेस बंद होत्या. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागला. काही दिवसांनी कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल केले. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात दररोज केवळ ५० हजार लोक एसटीने प्रवास करीत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने यात आणखी घट झाली झाली आहे. आता दररोज ३९ ते ४१ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. त्यातच वाढलेली रुग्णसंख्या व बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला उधाण आले आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास एसटी महामंडळाला मोठे नुकसान होणार आहे.
जालना जिल्ह्यात चार आगार आहेत. यात जाफराबाद, परतूर, अंबड व जालना यांचा समावेश होतोे. जिल्ह्यातून दररोज शेकडो बसेस ये-जा करतात. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे.
पूर्ण मार्गावर निम्मे प्रवासी
जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. बहुतांश लोक बसनेच प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाला चांगले उत्पन्नदेखील मिळते. परंतु, सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे पूर्ण मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. एरवी एका बसमध्ये ३२ जण प्रवास जातात. आता केवळ १० ते १५ प्रवासी जात असल्याचे सांगण्यात आले.
११ मार्गावर एसटी बंदच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास २०० बसेस बंद होत्या. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १९९ बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही ११ मार्गावरील बसेस बंद आहेत. दरम्यान, शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता रुग्णसंख्या वाढल्याने प्रवासी संख्या पुन्हा घटली आहे.
ना मास्क ना डिस्टन्सिंग
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. असे असताना प्रवाशांकडून नियमांचे पालन केले जात नाही. बहुतांश प्रवासी ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.