भोकरदन : कर्तव्य बजावत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भिवपूर (ता.भोकरदन) येथील जवानाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी पुणे येथे घडली.
गणेश संतोष गावंडे (३६) असे मयत जवानाचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील भिवापूर येथील जवान गणेश गावंडे हे २००५ मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरमधून त्यांची बदली पुणे येथे झाली होती. गणेश गावंडे हे सोमवारी सकाळी पुणे येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावंडे यांच्या आई, पत्नी, मुले व भावांनी हंबरडा फोडला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.