सध्या राज्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत असताना पारध येथून जवळच असलेल्या जाळीचादेव वाडी येथेदेखील शुक्रवारी तब्बल २५ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत खबरदारीच्या उपाययोजना केल्या. पारध पोलिसांनी शुक्रवारी संपूर्ण गाव सील केले. या प्रकारामुळे परिसतील ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहे. असे असताना जाळीचादेव वाडी परिसरातील पारध, वालसावंगी, धावडा, वाढोणा, विझोरा, पद्मावती, पिंपळगाव रेणुकाई, लेहा शेलूद, अवघडराव सावंगी आदी गावांतील ग्रामस्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांना तिलांजली दिल्याचे दिसत आहे. परिसरात ग्रामस्थांचा मुक्तसंचार पहावयास मिळत आहे. फक्त बँक, शाळा, कॉलेज आणि इतर कार्यालयातील कर्मचारी नियमांचे पालन करत आहे. बाकीचे ग्रामस्थ मात्र बिनधास्त फिरताना दिसत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पारध परिसरात कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST