गेल्या वर्षी म्हणजे साधारपणे २२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. या घटनेच्या वर्षपूर्तीला उणापुरा एक महिना राहिला आहे. असे असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण छुप्या पध्दतीने वाढत आहेत. ही रुग्ण संख्या वाढण्यामागे कमी झालेल्या कोरोनाच्या टेस्ट हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्दी, तापाची लक्षणे दिसूनही अनेकजण त्यावर वरवरचे उपचार करून स्वत:ला दिलासा देण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांना कोरोना झाला की, नाही याची वैद्यकीय चाचणी करून घेण्यास आज अनेक अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितही घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी एप्रिल, मे महिन्यात ज्या प्रमाणे प्रभागनिहाय कंपल्सरी टेस्ट केल्या होत्या. तशाच पध्दतीने या टेस्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. शंभरातील जवळपास ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टनंतर पुढे येऊ शकते असे जाणकारांनी सांगितले.
चौकट
अनलॉकचा परिणाम
कोरोनाने आर्थिक चक्र उलटे फिरले होते. यामुळे अनेक उद्योग, रोजगार बंद होऊन सर्वात जास्त नुकसान आणि अडचण ही गोरगरीबांचीच झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नंतर हळूहळू सर्व काही अनलॉक अर्थात सर्व व्यवहार, व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यात आले. त्याामुळे पोटाच्या भाकरीचा आणि हक्काच्या रोजगाराचा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु या काळात अनेकांनी मास्कचा वापर टाळण्यासह स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्ष पुन्हा भोवणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
चाैकट
जमावबंदीचे प्रशासनासमोर आव्हान
कोरोना काळात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने बुधवारपासून जमाव बंदी लागू केली आहे. परंतु या जमाव बंदीच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. आज बाजारातील गर्दी ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे.