आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील गट क्रमांक ८१२ मधील भाऊसाहेब हरी ठाले यांच्या राहत्या घराला बुधवारी दुपारी आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
आव्हाना येथील भाऊसाहेब ठाले हे कुटुंबासह शेतात राहतात. बुधवारी दुपारी अचानक घरामधून धुराचे लोट निघताना शेजारी असलेल्या मुलांना दिसले. मुलांनी याची माहिती भाऊसाहेब ठाले यांना दिली. परंतु, तोपर्यंत त्यांच्या घरातील कपडे, धान्य, पैसे, तीन पत्रे व शेतीचे साहित्य जळून खाक झाले होते. दुपारच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात असल्यामुळे व जनावरे चरण्यासाठी सोडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत जवळपास सरासरी एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.