लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यभरात घरफोड्या करून धुमाकूळ घातलेल्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सागरसिंग पिता सुरजसिंग उर्फ फंट्यासिंग अंधरेले, मखनसिंग कृष्णासिंग भादा (दोघे रा. शिकलकरी मोहल्ला, जालना) अर्जुनसिंग छगनसिंग भोंड (२३, रा. वल्ली मामू दर्गा, जालना) व चोरीचे दागिने खरेदी करणारा आकाश कैलास कुलथे (२४, रा. सुवर्णकार नगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
जालना शहरातील नळगल्ली येथील अंशुल नरेंद्रकुमार आबड यांचे १४ फेब्रुवारी रोजी घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आरोपी सागरसिंग पिता सुरजसिंग उर्फ फंट्यासिंग अंधरेले याने त्याच्या साथीदारांसह ही चोरी केली आहे. या माहितीवरून पोलिसांनी शक्कल लढवून तीन पथके तयार केली. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकाचवेळी कारवाई करून सागरसिंग अंधरेले व मखनसिंग भादा या दोघांना शिकलकरी मोहल्ला येथून तर अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याला वल्ली मामू येथून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या चोरीतील सोन्या व चांदीचे दागिने हे जालना येथील सराफ आकाश कैलास कुलथे (वय २४, रा. सुवर्णकार नगर ) याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर आकाश कुलथे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सोन्याची १२० ग्रॅम वजनाची लगड, ९ किलो ९६८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख रक्कम १,८०,९०० असा एकूण १३,३८,८०६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हेडकाॅन्स्टेबल हरिश राठोड, प्रशांत देशमुख, किशोर एडके, फुलचंद हजारे, पोलीस नाईक संजय मगरे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सचिन चौधरी, किशोर पुंगळे, किशोर जाधव, विलास चेके, संदीप मान्टे, कृष्णा तंगे, परमेश्वर धुमाळ, किरण मोरे, रवी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, सुरज साठे, रमेश पैठणे, महिला अंमलदार मंदा नाटकर, आशा जायभाये, मंदा बनसोडे, शमशाद पठाण यांनी केली.