जालना : मागील वर्षभरापासून शहरातील बसस्थानकातील हिरकणी कक्षाच्या खोलीचे नूतनीकरण सुरू आहे.
त्यामुळे हिरकणी कक्ष बंद असल्याने स्तनदामातेला स्तनपान उघड्यावर करावे लागत आहे. यात मातांची कुचंबना होत आहे.
आजही बसचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात असून, रोज हजारो स्तनदामाता लालपरीने प्रवास करतात. दरम्यान, बाळाला बस व बसस्थानकात उघड्यावर स्तनपान करताना अनेकदा महिलांची कुचंबना होते. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी बसस्थानकांत हिकरणी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु, एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे अनेक बसस्थानकांत हिरकणी कक्षाची मोठी दुरवस्था झालेली आहे.
जालना आगार राज्याच्या मध्यभागी असल्यामुळे या आगारातून शेकडो स्तनदा माता नियमित प्रवास करतात. असे असतानाही येथील हिकरणी कक्षाच्या खोलीचे वर्षभरापासून कामकाज सुरू असल्याने कक्ष बंद केला आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापासून सुरू असलेल्या या कक्षाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्तनदा मातांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वेळीच हिरकणी कक्षाचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी स्तनदामातांमधून होत आहे.
चौकट
जालन्यातील हिरकणी कक्ष वर्षभरापासून बंदच
सरासरी मागील पाच वर्षांपूर्वी जालना बसस्थानकात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेनंतर चार वर्षे हा कक्ष सुरक्षित सुरू होता. परंतु, मागील वर्षभरापासून या कक्षाच्या खोलीचे बांधकाम सुरू असल्याने कक्ष बंद असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
कोट
लवकरच हिरकणी कक्ष होईल कार्यान्वित
मागील वर्षभरापासून जालना आगारातील हिरकणी कक्षाच्या खोलीचे बांधकाम सुरू आहे. सध्या बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आगारातील कक्ष सुरू होईल.
- पंडित चव्हाण
आगारप्रमुख, जालना
महिलांना माहिती नाही...
एसटी महामंडळाच्या आगारात हिरकणी कक्ष असल्यासंदर्भात काही महिलांना विचारपूस केली असता त्यांनी हिरकणी कक्ष म्हणजे काय? हेच माहीत नसल्याचे सांगितले. तर हिरकणी कक्षाची स्तनदा मातांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही बसस्थानकात स्तनदामातांसाठी हिरकणी कक्ष असल्याचे अनाउंसिंग करत असल्याची माहिती बसस्थानकामधून देण्यात आली.