वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
जालना : तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजुरवठ्यामुळे ग्राहकांना एक ना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लघु व्यवसायिकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शिवाय रब्बीतील पिकांवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे तरी संबंधितांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पांडुरंग पोहेकर यांनी केली आहे.
घरगुती गॅसची दरवाढ रद्द करण्याची मागणी
भोकरदन : घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. गॅसची दरवाढ झाल्याने महिलांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे गॅसची दरवाढ कमी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्षा डॉ. सुनीता सावंत यांनी दिला आहे.
बाणेगाव येथे मराठा आरक्षणासाठी ठिय्या
घनसावंगी : तालुक्यातील बाणेगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. परंतु, मागणी मान्य होत नसल्याने शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला.